Wednesday 28 May 2014

दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रातील गणपती(कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,अहमदनगर)

कोल्हापूर
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीचा गणपती - शिरोळ तालुक्यात कागलवाडजवळ कृष्णा नदीच्या काठी असलेले हे गणेशस्थान ५६ विनायकांपैकी आहे असे म्हणतात. सरदारकी मिळण्यापूर्वी पटवर्धनांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशाला तामसी उपासना चालत नाही. तसे करणाऱ्यांना भयंकर स्वरूपात गणेशाचे दर्शन होते. असे अनुभव आल्याचे सांगितले जाते.

कोल्हापूरचा जोशीराव गणपती किंवा बिनखांबी गणेशमंदिर - कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर हे गणेशस्थान आहे. वाईकर यांच्याकडील विहिरीच्या दुरुस्तीत एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली. तेव्हा १८८२ साली कोल्हापूरचे छत्रपती आणि नागरिकांनी मिळून या मूर्तीची मंदिरात स्थापना केली. या मंदिराला खांब नसल्यामुळे त्याला बिनखांबी गणेशमंदिर असेही संबोधले जाते. मूळचे संगमेश्वरचे जोशीराव ज्योतिषी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात येथे राहत असत. जोशीरावांच्या शेजारी असल्याकारणाने या गणपतीला जोशीराव गणपती असेही म्हणतात.

कोल्हापुरातील अन्य गणपतीस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे - महालक्ष्मी मंदिरातील घाटी दरवाजाकडे तोंड असलेला आणि नवसाला पावतो अशी ख्याती असलेला मोक्षी गणपती; कसबा बीड, जि. कोल्हापूर येथील शिलाहारांचा गणपती. करवीर तालुक्यातील चंबुखडी येथील सिद्ध बटुकेश्वर गणेश; गडहिंग्लज तालुक्यातील मौजे इंचनाळचा श्री गणेश.

सांगलीचे प्रसिद्ध गणेश मंदिर
दक्षिण महाराष्ट्रात सांगलीचे गणेश मंदिर देवस्थान फार प्रसिद्ध आहे. श्री गणेश म्हणजे सांगलीच्या पटवर्धनांचे कुलदैवत. थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी १८४३ मध्ये या गणेशाची स्थापना केली. या मंदिराची निर्मिती ज्योतिबाच्या डोंगरावरील उत्कृष्ट प्रतीच्या काळ्या पाषाणापासून करण्यात आलेली आहे. या गणेश मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पाच दिवस मोठ्या समारंभपूर्वक गणेशोत्सव साजरा केला जातो.

याशिवाय सांगली जिल्ह्यात मिरजेतील तळ्यावरचा गणपती आणि तासगावचे गणपती पंचायतन ही गणेशस्थाने प्रसिद्ध आहेत.

साताऱ्याचा ढोल्या गणपती
साताऱ्यातील या गणेशाची मूर्ती आकाराने १० ते १२ फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात. या गणपतीचे मूळ नाव मात्र "ज्येष्ठराज' असे आहे. हे फार प्राचीन गणेश मंदिर आहे. मराठेशाहीच्या आधी शिलाहार वंशातील राजा भोज याने साताऱ्याचा किल्ला बांधला. त्यावेळी गावच्या रक्षणासाठी त्याने या गणेशाची स्थापना केली. साताऱ्यातील सर्व मंगलकार्यांची पहिली अक्षता या गणपतीला दिली जाते.

या गणपती शिवाय सातारा शहरात; खिंडीतील गणपती, शनिवार पेठेतील फुटका गणपती, चिमणपुऱ्यातील गारेचा गणपती आदी गणेशस्थाने आहेत. तर सातारा जिल्ह्यात वाई येथे कृष्णाकाठावरील ढोल्या गणपती, वाई तालुक्यातील ब्राम्हणशाई येथील श्री गणपती देव संस्थानचा गणपती; तसेच सातारा तालुक्यातील अंगापूर येथील शाहूकालीन गणेश मंदिर आदी गणेशस्थाने भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत.

अक्कलकोट, जि. सोलापूर येथील स्वयंभू गणेश मूर्ती
अक्कलकोट महाराजांच्या समाधी मंदिराजवळच त्यांचे भक्त चोळप्पा यांचा वाडा आहे. चोळप्पांचे वंशज हल्ली या वाड्यात राहतात. त्यांच्यापैकी श्री अप्पू महाराज यांच्याकडे ही स्वयंभू गणेश मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोटच्या ज्या वाड्यात सर्वप्रथम अक्कलकोटचे स्वामी आले त्याच वाड्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी ही मूर्ती सापडली. ही गणेशमूर्ती मांदाराची असून सोंड लांब व उर्ध्वगामी आहे. या गणेशाची प्राणप्रतिष्ठा १९६६ रोजी झाली. नवसाला पावतो अशी ख्याती असल्याकारणाने अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी येणारे अनेक भक्त चोळप्पांच्या वाड्यातील या गणेशाचे आवर्जून दर्शन घेतात.

याशिवाय सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून चार किलोमीटर अंतरावरील पखालपूरचा गणपती प्रसिद्ध आहे.

अहमदनगरमधील अक्षता गणपती - अहमदनगर शहराच्या गुजरगल्लीत दोनशेवर्षांपेक्षाही जुने असे हे गणपतीमंदिर आहे. हे स्वयंभू आणि जागृत स्थान समजले जाते. येथील श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंगलकार्याच्या प्रसंगी या गणपतीला वाजत-गाजत अक्षता देण्याची प्रथा असल्याने या गणेशाला अक्षता गणेश हे नांव पडले.

माळीवाडा गणपती - नगर शहराच्या दक्षिणेकडे माळीवाडा वेशीने आत जात असताना हे पुरातन गणेश मंदिर लागते. येथील गणेशमूर्ती १० फूट उंच, उजव्या सोंडेची आहे. असे सांगतात की सुमारे साठेक वर्षांपूर्वी या गणेशमूर्तीला घाम आला होता. तेव्हा यज्ञयागादीक करून तो थांबविण्यात आला. तेव्हापासून हे मंदिर भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध पावले आहे.

आव्हाने येथील "निद्रिस्त' गणपती
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर अवनी नदीच्या तीरावर आव्हाने बुद्रूक नावाचे गाव आहे. या गावी हा "निद्रिस्त' गणपती वसलेला आहे. महाराष्ट्रात अशी दुर्मिळ मूर्ती अन्यत्र कोठेही नाही. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या मोरगावच्या गणपतीचे अंशात्मक स्थान म्हणून हा गणपती ओळखला जातो.

No comments:

Post a Comment