Wednesday 28 May 2014

पुणे परिसरातील गणपती


महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांची वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत.
पुणे परिसरातील गणपती

कसबा गणपती :- हे पुण्याचे ग्रामदैवत. इ. स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईंनी समारंभपूर्वक कसबा गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली व दगडी गाभारा बांधून दिला. श्री शिवाजी महाराजांच्या वाड्याला लागूनच हे स्थान असल्याने शिवाजी महाराज व त्यांच्या घराण्यातील मंडळी वारंवार या गणपतीच्या दर्शनास जात असत. प्रथम ही मूर्ती तांब्याच्या आकाराची होती परंतु वारंवार शेंदूर लावीत असल्यामुळे तिची उंची आता सुमारे तीन फूट आणि रुंदी पाच फूट झाली आहे. पुण्यात शनिवारवाड्याच्या बाजूलाच कसबा गणपतीचे स्थान आहे.

सारसबाग - श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना थेऊरच्या गणेशाद्वारे झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी उजव्या सोंडेच्या मूर्ती थेऊरची प्रतिकृती म्हणून इ. स. १७७४ मध्ये सारसबागेच्या तळ्यात स्थापन केली. त्यामुळे हा गणपती पुढे कितीतरी दिवस तळ्यातील गणपती म्हणून ओळखला जात असे. आता सारसबाग तळ्यातील सिद्धिविनायक म्हणून तो ओळखला जातो. पेशवेकालीन मूर्ती खराब झाल्यामुळे एकदा १८८२ आणि एकदा १९९० अशी दोनदा बदलण्यात आली. पर्वतीच्या पायथ्याशी, स्वारगेट जवळ हे स्थान आहे.

दशभुज चिंतामणी - पुण्याला पर्वतीच्या पायथ्याजवळ लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये श्रीगणेशाचे हे स्थान आहे. दशभुजा असलेली ही मूर्ती अति प्राचीन आहे. श्री दामोदर खळदकर यांना झालेल्या दृष्टांतानुसार खोदाईकाम करताना ९ ऑक्टोबर १९६४ रोजी ही मूर्ती आढळली. हे अत्यंत जागृत ठिकाण असून अनेक श्रीभक्तांना तसे अनुभव आले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती - हा पुण्यामधील एक मानाचा गणपती आहे. या श्रीच्या मुर्तीविषयी (सन १८९३) :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील गृहस्थ  होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपती बाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती होय. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजा चालू आहे. ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पण तेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले. भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोर लोकांनी मनोमन आर्शिवाद दिले आणि अशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.

याशिवाय पुणे शहरात श्रीगणेशाची अनेक स्थाने आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे -शनिवार पेठेतील वरद-गुपचूप गणपती, सहकारनगर, पर्वती जवळील दशभुज चिंतामणी, सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती, गणेशखिंडीतील श्री पार्वतीनंदन, कर्वे रोडवरील दशभुज चिंतामणी, पर्वतीजवळ थोरले नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेला सदरेतला गणपती, नारायण पेठेतील मोदी सिद्धिविनायक गणपती.


चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर
चिंचवड स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोरया गोसावी मंगलमूर्तीचे मंदिर आहे. ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. हे एक जागृत गणेशस्थान आहे. इ. स. १६५५ मध्ये मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १६५९ मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी येथे मंदिर उभारले. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे श्री समर्थ रामदास, श्री संत तुकाराम महाराज हेही या स्थानाचे भक्त होते.


No comments:

Post a Comment