Wednesday 28 May 2014

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ,मराठवाड्यातील अन्य गणेशस्थाने

उत्तर महाराष्ट्रातील गणपती

नाशिकचा मोदकेश्वर
:
नाशिक शहरात गोदावरी नदीच्या तीरावर मोदकेश्वराचे पुरातन मंदिर आहे. याचा आकार मोदकाच्या आकाराचा असल्यामुळे त्याला मोदकेश्वर असे नाव पडले. जागृत स्थान म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. गणपतीच्या ५६ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. या गणपतीला हिंगण्यांचा गणपती म्हणूनही ओळखले जाते. याविषयी पुराणात एक आख्यायिका सांगितली जाते, की श्री शंकरांनी मदनाला शाप दिल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी गणेशोपासना सुचविली. त्यावेळी रतिसह मदनाने कठोर गणेशसाधना करून श्री गणेशाचा कृपाप्रसाद मिळविला. मोदकेश्वर म्हणजे मदनाने आराधना केलेले "कामवरद' महोत्कट क्षेत्र होय.

ढोल्या गणपती
:
साताऱ्या प्रमाणेच नाशिकमध्येही एक ढोल्या गणपती आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती अशोक स्तंभ चौकात या गणपतीचे मंदिर आहे. ही गणेशमूर्ती सात ते आठ फूट उंचीची आहे. नाशिकपासून साधारणतः: आठ किलोमीटर अंतरावर आनंदवल्ली गाव आहे. या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर गणेशाचे पेशवेकालीन मंदिर आहे. याला नवश्या गणपती असे म्हणतात. हे स्थान फारच रम्य आणि शांत स्थान आहे. या ठिकाणी मंदिराच्या सभागृहात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. अशा या आठ मूर्ती आणि गाभाऱ्यातील मूळ मूर्ती असे मिळून एकूण नऊ गणपती होतात म्हणून याला नवश्या गणपती हे नाव पडले असे म्हणतात. तर काही भक्तांच्या सांगण्यानुसार नवसाला पावतो म्हणून या गणपतीचे नाव नवश्या गणपती असे आहे.

याशिवाय नाशिक शहरात सोमवार पेठेतील पेशवेकालीन खांदवे गणपती, काळाराम मंदिरातील गणपती; गोरेराम मंदिराच्या पश्चिमेकडील दशभुज सिद्धिविनायक; पंचवटीतील गणेशवाडी येथील पुरातन तिळ्या गणपती; कपालेश्वर मंदिराजवळील उजव्या सोंडेचा गणपती; दूध बाजारातील त्र्यंबक दरवाजा चौक गणपती; उपनगर, नाशिक रोड येथील इच्छामणी गणपती; भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश; रविवार कारंजा चौकातील श्री सिद्धिविनायक अशी अनेक गणेशस्थाने आहेत.

नाशिक जिल्ह्यातील गणेश मंदिरांची नावे अशी - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील पूर्व दरवाज्याकडचा सिद्धिविनायक; सिन्नरच्या भैरवनाथ मंदिरातील श्रीगणेश; अंजनेरी येथील पुरातन गणेश मूर्ती; सप्तश्रृंगी गडा खालील गणेश कुंडाजवळचा श्रीगणेश.

धुळे
धुळे शहरात पेशव्यांच्या काळचा उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. तसेच येथील पांझरा नदीकाठचे गणेशमंदिर गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

जळगाव
:- श्रीगणेशाचे अर्धपीठ अर्थात एरंडोलजवळील "पद्मालय'
जळगाव जिल्ह्यातील "पद्मालय' हे प्रसिद्ध गणेश क्षेत्र आहे. श्रीगणेशाच्या अडीच पीठांपैकी "अर्ध' पीठ म्हणून "पद्मालय' क्षेत्र ओळखले जाते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एक मैल अंतरावरील एका डोंगरावर पदाय गणेशाचे स्थान आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथील गाभाऱ्यात श्रीगणेशाच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. पैकी एक उजव्या सोंडेची तर एक डाव्या सोंडेची आहे. भक्तगणांत हे स्थान नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेशस्थानापासूनच सुमारे पाच किलोमीटर अंतरावर भीम-बकासूर युद्धाची जागा आहे.


विदर्भातील गणपती

यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा श्री चिंतामणी
यवतमाळहून वर्धा - नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळंबचा चिंतामणी आहे. हे स्थान विदर्भातील कदंबपूर म्हणून ओळखले जाते. गणपतीच्या २१ क्षेत्रांमध्ये हे स्थान गणले जाते. गणेशपुराण आणि मुद्गल पुराणात या क्षेत्रासंबंधीचे आणि तेथील चिंतामणी संबंधीचे वर्णन आलेले आहे. अष्टविनायकांपैकी थेऊर येथील चिंतामणी गणेशाची जी कथा वर्णिली आहे; तीच याही गणेशाची आहे. या गणेशाची स्थापना इंद्राने केली असल्याचा पुराणात दाखला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर खूप खोलात आहे. त्यामुळे जवळ गेल्याशिवाय मंदिराचे दर्शन होत नाही. मंदिरासमोरच दर्शनी बाजूस उजव्या हाताला चौमुखी गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच पाषाणातून ही मूर्ती कोरलेली आहे. या मंदिराच्या काही पायऱ्या उतरल्यानंतर मध्येच एक चौकोनी कुंड आहे. यालाच पावनकुंड असे म्हणतात. या कुंडाला जिवंत झरे आहेत.

विदर्भातील अन्य गणपतींची स्थाने अशी - वर्धा जिल्ह्यातील केळझरचा एकचक्रा गणेश; नागपूर जिल्ह्यातील आधासा (क्षेत्र अदोष) येथील शमी विघ्नेश; नागपूर शहरातील सीताबर्डी किल्ल्याचा गणपती; नागपूर शहरातील टिळक पुतळ्यासमोरचा श्री सिद्धिविनायक; बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील स्वयंभू वटसिद्ध गणेश; पायानील, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील सागाच्या जंगलातील गणेश मंदिर; अकोला शहरातला स्वयंभू श्री मांदार गणेश; चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर, ता. गोंडपिंपरी येथील श्री सिद्धिविनायक; पवनार, वर्धा येथील श्रीचिंतामणी.

मराठवाड्यातील गणपती
औरंगाबादजवळील वेरूळचा लक्षविनायक - औरंगाबादपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावी गणेशाचे हे स्थान आहे. गणेशाच्या एकवीस स्थानांपैकी एक स्थान समजले जाते. शिवपुत्र स्कंदाने या गणेशाची स्थापना केल्याचा पुराणात उल्लेख सापडतो.

सेंदूरवाड्याचा सिंदुरांतक गणेश
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील सेंदूरवाडा येथे या गणेशाचे स्थान आहे. खाम नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. खाम नदीत हेमाडपंती बांधणीचे श्रीगणेशाचे मंदिर आहे. हे एक अत्यंत जागृत स्थान समजले जाते. याच ठिकाणी श्रीगणेशाने सिंदूरासुराशी युद्ध केले. त्यावरून या गणेशाला सिंदुरांतक गणेश हे नाव पडले. येथील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे डाव्या बाजूला त्याच दगडात म्हसोबाची मूर्ती कोरलेली आढळते. याठिकाणी उंदीर हे गणपतीचे वाहन नाही. उंदीर आणि गणपतीचे याच ठिकाणी युद्ध झाले होते अशीही एक आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे.

मराठवाड्यातील अन्य गणेशस्थाने पुढीलप्रमाणे - अजिंठ्याची गणेशलेणी; सातारा येथील द्वादशहस्त गणेश; औरंगाबाद शहरातील समर्थ नगर येथील श्री वरद गणेश मंदिर; मराठवाड्यातील स्वयंभू सिद्धस्थान नांदेड येथील त्रिकुट गणेश; नांदेड शहरातील जोशीगल्लीतील श्रीगजानन; नांदेड शहरातील नवसाला पावणारा आखाड्याचा गणपती; कंधार, जि. नांदेड येथील साधुमहाराजांचा गणपती; दाभाड, ता. नांदेड येथील श्री सत्य गणपती मंदिर; नवगण राजुरी, जि. बीड येथील नवगणपती; अंबाजोगाई, जि. बीड येथील पाराचा गणपती; बीड जिल्ह्यातील नामलगांव गणेश; राक्षसभुवन, जि. बीड येथील विज्ञानगणेश क्षेत्र; गंगामसले, जि. बीड येथील भालचंद्र गणेश; गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेले जालना जिल्ह्यातील राजूर, ता. भोकरदन येथील वरेण्यपुत्र गणपती क्षेत्र.


1 comment: